इंटरनेट अर्थात माहिती महाजालाचे लहान मुलांमध्ये वाढते आकर्षण लक्षात घेऊन ‘गुगल’ या लोकप्रिय सर्च इंजिन कंपनीने लहान मुलांसाठी खास ‘किडल’ नावाने सर्च इंजिन सुरू केले आहे. इंटरनेट लर्निंगच्या हल्लीच्या जगात लहान मुलांमध्ये इंटरनेटच अप्रूप असतं. पण इंटरनेटवर आता प्रौढ आशय सर्च करण्याचे प्रमाण वाढले असल्याने पालक आपल्या चिमुकल्याच्या इंटरनेटवरील वावराबाबत साशंक असतात. इंटरनेटवर चांगल्याखेरीज अनेक वाईट गोष्टींचाही भरणा आहे. त्यामुळे इंटरनेटपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी कित्येक पालक धडपडत असतात, किंबहुना तसा त्यांचा आग्रहच असतो. पण त्यांच्या मदतीला गुगल धावून आलंय. ‘गुगल’ने सुरू केलेल्या ‘किडल’ या खास लहान मुलांसाठीच्या सर्च इंजिनवर कोणत्याही प्रकारच्या प्रौढ आशय सर्च होत नाही. या सर्च इंजिनवर सर्व प्रकारच्या पोर्न साईट्स आणि छायाचित्रांना प्रतिबंध करण्यात आला आहे. ‘किडल’मुळे मुलांवर कोणतीही बंधनं न घालता मुलांना त्यांच्या अपेक्षांप्रमाणे (व तुम्हाला कोणतीही काळजी न लावता) इंटरनेट वापरता येईल, अशी सोय गुगल कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. ‘किडल’वर शोध घेऊन काढण्यात आलेला कोणताही मजकूर वा चित्र, चित्रफीत ही मुलांच्या दर्जाचीच असेल. हा मजकूर, चित्र, चित्रफीत हे ‘किडल’चे संपादक आधी स्वत: निवडून घेतील आणि तो शाळकरी वयाच्या मुलांच्या दर्जाचा आहे की नाही याची खातरजमा करतील. अशाप्रकारे, किडलमधून उपलब्ध होणारा मजकूर (साईट्स व पेजेस) विशेष चाळणीमधून जाणार आहे. त्यामुळे ज्या पालकांच्या अपरोक्ष मुलं इंटरनेट वापरतात, त्या पालकांनी आता निर्धास्त राहायला हरकत नाही