तरुणांना झाडू मारण्याची शिक्षा

सहलीत दारू पिऊन धिंगाणा घातल्यानंतर हाणामारी करणाऱ्या युवकांच्या दोन गटांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी गुन्हा रद्द करण्याच्या मोबदल्यात रेल्वे स्थानक आणि शाळा स्वच्छता करण्याची शिक्षा सुनावली. यातील एका गटाला पालिका शाळा, तर दुसऱ्या गटाला मीरा रोड रेल्वे स्थानक साफ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तीन महिने प्रत्येक रविवारी ही सेवा करण्याचेही न्यायालयाने हे आदेश देताना स्पष्ट केले. आशीष धावणे आणि त्याचे नऊ मित्र तसेच अ‍ॅसलिन अँब्रोज आणि त्याचे नऊ मित्र गोराई येथे सहलीसाठी गेले होते. तेथील फॉन्सेका रिसॉर्टमध्ये ते उतरले होते. परंतु स्वतंत्रपणे सहलीसाठी गेलेल्या या तरुणांनी मद्यपानानंतर धिंगाणा घालण्यास आणि एकमेकांना त्रास देण्यास सुरुवात केली. दोन्ही गटांनी सुरुवातीला प्रकरण मिटवले. परंतु मध्यरात्री तीनच्या सुमारास अँब्रोजचा मित्र मुकेश राठोड याला प्रसाधनगृहात जाताना धावणे याच्या मित्रांनी गाठले आणि त्याला मारहाण केली. परिणामी दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आणि दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. पुढे दोन्ही गटांना या तक्रारींचा भवितव्यावर काय फरक पडू शकतो हे लक्षात आल्यावर त्यांनी परस्पर सामंजस्याने एकमेकांविरोधात दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्याची तयारी दाखवली. त्यासाठी दोन्ही गटांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने दोन्ही गटांची एकमेकांविरोधात दाखल केलेल्या गुन्हा रद्द करण्याची विनंती मान्य केली. मात्र त्या मोबदल्यात झाडू मारण्याची समाजसेवा करावी लागेल, अशी अट घातली. दोन्ही गटांनी ही अट मान्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र पोलिसांच्या वतीने अ‍ॅड्. जयेश याज्ञिक यांनी तीव्र विरोध केला. मात्र न्यायालयाने या युवकांतील धावणे याच्या पालिकेच्या शाळांमध्ये जाऊन सफाई करण्याचे, तर अँब्रोज याच्या गटाला मीरा रोड स्थानक साफ करण्याचे आदेश दिले. तसेच शाळांच्या मुख्याध्यापकांनी व स्टेशन मास्तरने हे युवक त्यांचे काम प्रामाणिकपणे करत आहेत की नाही यावर देखरेख ठेवावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *