हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी नरेंद्र मोदींची विषारी मोहीम

हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी नरेंद्र मोदींची विषारी मोहीम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू व मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याची विषारी मोहीम राबवत आहेत, अशी घणाघाती टीका कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. येथे केरळ प्रदेश कॉँग्रेस समितीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींवर टीका करताना गांधी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात हिंदू व मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा एकमेव कार्यक्रम पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राबवत आहे. बिहारमध्ये त्याचा प्रत्यय आला असून त्याची पुनरावृत्ती भविष्यात उत्तर प्रदेश, केरळ व पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. छुप्या पद्धतीने विषारी प्रचार करणे व विकासाच्या मुद्दय़ावर भाजपा कायम प्रचार करत असतो. भाजपाचे आव्हान कॉँग्रेसने स्वीकारले आहे.

आम्ही महाआघाडी करून बिहारमध्ये भाजपाला पराभूत केले, याची आठवण गांधी यांनी करून दिली. मोदींच्या वरवरच्या कारभाराचा पंचनामा करताना गांधी म्हणाले की, मोदी सरकारने नागा करार केला. तत्पूर्वी त्यांनी कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना माहिती दिली. हे करताना त्यांनी मणिपूर, अरुणाचल प्रदेश व आसामच्या मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवले. विशेष म्हणजे या सरकारमधील गृहमंत्र्यांनाही या कराराचा थांगपत्ता नव्हता. त्यापुढेही जाऊन आम्ही चौकशी केल्यानंतर कोणताही करार झाला नसल्याचे आढळले. खुद्द पंतप्रधानांनाही काय चालले आहे याची माहिती नव्हती. यातूनच हे सरकार किती उथळपणे काम करत असल्याचे दिसत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींची प्रत्येक कृती केवळ वरवरची असून प्रसारमाध्यमांना हाताशी धरून ते प्रत्येक योजनेचा गाजावाजा करतात. एका संकल्पनेनंतर ते दुसरी संकल्पना राबवतात, अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *