महाराष्ट्रातील ६०० गडकोट किल्ल्यांची सुरक्षितता धोक्यात

महाराष्ट्रातील ६०० गडकोट किल्ल्यांची सुरक्षितता धोक्यात

ज्या गडकिल्ल्यांवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याची सुरुवात केली त्या गडकोट किल्ल्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून या मुळे सरकारी पातळीवर राज्यातील ६०० पेक्षा जास्त किल्ल्यांचे संवर्धन होत नाही. असा आरोप राज्य गडकिल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बालकवडे यांनी केला.

मुंबईपासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरुड जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या समोर असलेल्या पद्मादुर्ग किल्ल्याच्या आवारातून ६० किलो वजनाची ऐतिहासिक तोफ चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांच्या संवर्धन तसेच सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईच्या जवळचा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जात असून एकटय़ा रायगड जिल्ह्यात ३१ गडकोट किल्ले आहेत. त्यापैकी ५ किल्ले जलदुर्ग किल्ले असून या किल्ल्यात जवळपास १०० ऐतिहासिक दुर्मिळ तोफा असल्याचे समोर आले आहे. या ऐतिहासिक वस्तूंचे रक्षण,जतन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाला अपयश आले आहे.

छत्रपति शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची आíथक राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याची अवस्थाही तशीच झाली असून महाराष्ट्रातील एकूण ६०० गडकोट किल्ल्यापैकी केवळ २०० गडकोट किल्ल्यांची देखभाल पुरात्व विभाग करीत असल्याचे बालकवडे यानी सांगितले. उर्वरीत ४०० गडकोट किल्ल्यांचे संरक्षण करण्यात पुरातत्व विभागाला अपयश आले आहे. राज्य आणि केंद्र सरकार यांच्या समन्वयातील अभावामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संवर्धन होत नसल्याचे अनेक प्रकार असून त्यामध्ये गड कोट किल्ल्यांच्या आवारात असणा-या ऐतिहिक शिलालेख, तोफा, दरवाजे, पाय-या, तटबंदी, बुरुज यांची पुरेशी सुरक्षा होत नाही. गडकिल्यांचे रक्षणासाठी तैनात असलेले पुरातत्व विभागातील कर्मचा-यांना गणवेशाची सक्ती नाही. त्यामुळे महत्वाच्या गडकोट किल्ल्यांच्या आवारात असे कर्मचारी इतर पर्यटक मंडळीसारखेच केवळ फेरफटका मारतात.

मुरुड जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर असलेल्या पद्मादुर्ग किल्ल्यात लहान मोठय़ा ८० तोफा अस्तित्वात होत्या त्यापैकी ४० ते ४५ तोफा किल्ल्याच्या आवारातून गायब झाल्याचा प्रकार यापूर्वीच निदर्शनास आला आहे. घोसाळगड येथील शिलालेख असेच धूळखात पडले असून त्याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष नसल्याचे गडकोटकिल्ले अभ्यासक एस. एम. देशमुख यांनी सांगितले.

रेवदांडा किल्ल्यात मद्यपींचा वावर

रायगडमधील रेवदांडा किल्ला प्रेमीयुगुलांनी वेढला आहे. कोर्लाई किल्ल्यात मद्यप्रेमींचा वावर आहे. त्यामुळे या किल्ल्यांचे महत्त्व जपले जात नसल्याची खंत देशमुख यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *