लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर एका बैलाच्या जागी पत्नीला औताला जुंपून शेतीची मशागत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
सुदृढ बैल देण्याचे आदेश
या घटनेची सरकारने दखल घेत पशुसंवर्धन विभागाने 10 जून रोजी तातडीने मदत म्हणून त्या शेतकऱ्याला एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र, मदतीसाठी दिलेला हा बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचं निष्पन्न झालं. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रशासनाने तत्काळ मदतीच्या नावाखाली आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुदृढ बैल देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे
बळीराजानं धनीणलाच जुंपलं औताला
देवणी तालुक्यातील बोंबळी येथील एका शेतकरी कुटुंबाची विदारक परिस्थिती समोर आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे या शेतकऱ्याचा एक बैल दगावल्याची घटना समोर आली होती. शेतीची कामे ठप्प होऊ नयेत म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीने दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतःला औताला जुंपून घेतले. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना देवणी येथील बोंबळी गावात घडली. स्वतःला औताला जुंपून औत ओढणाऱ्या या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हौसाबाई काशीनाथ गायकवाड असं या महिलेचं नाव आहे.
दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचं काम
शेतात काही दिवसांपूर्वी त्यांचा एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. खरीप हंगामातील पेरणीची वेळ सुरू असताना दुसरा बैल खरेदी करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्यानं अखेर कुटुंबानं स्वतःच शेतीची मशागत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी काशीनाथ गायकवाड नांगर हाकत असताना त्यांच्या पत्नी हौसाबाई काशीनाथ गायकवाड यांनी दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचे काम केलं. वृद्धापकाळातही शेती वाचवण्यासाठी या दाम्पत्याचा संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कठोर वास्तव अधोरेखित करणारं हे दृश्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या गायकवाड कुटुंबाला मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती, त्यानंतर त्यांना एक बैल उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र, तो बैल देखील आजारी असल्याचं आता तपासात निष्पन्न झालं आहे.
