सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली फोंडाघाट येथे पाच वर्षांपूर्वी आढळलेल्या मृतदेह हा आकस्मिक मृत्यू नसून तो खून होता याचा उलगडा मुंबई येथील घाटकोपर पोलिसांच्या क्राइम ब्रँचने केला आहे. या खून प्रकरणी चार संशयित आरोपींच्या घाटकोपर पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्यांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशपाक मुलाणी उर्फ निहाल (रा. सोलापूर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणात मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर, अतिष भगवान मोरे, ऋतूराज शेट्टी हे चौघेजण संशयित आरोपी असून ते मुंबई परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती घाटकोपर क्राईम ब्रँचच्या पोलीस पथकाने दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , कणकवली फोंडाघाट येथे दरीत कोसळून सुमारे पाच वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. बाजूलाच दुचाकी देखील असल्याने अशपाक दुचाकीसह घाटात कोसळला असावा, अशा प्राथमिक निष्कर्षानुसार कणकवली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र नुकताच एक जण दारूच्या नशेत या मृत्यूबाबत काहीतरी बोलला आणि हीच बाब घाटकोपर पोलिसांपर्यंत पोहोचली. घाटकोपर क्राइम ब्रांचने या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेत तपासाची चक्र वेगाने फिरवली. या चौघांनाही बुधवारी बोलावून घेतल्यानंतर पोलिसी हिसका दाखवत या खून प्रकरणातील चौघांनाही बोलते केले. या वेळेला अशपाक याचा खून हा आर्थिक देवाण-घेवाणीतून झाल्याची माहिती समोर आली.
