मुंबई… अनेकांनाच बहुविध कारणांनी खुणावणारं हे शहर. पोट भरण्यापासून ते अगदी भटकंती करण्यापर्यंत कैक कारणांनी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही बरीच मंडळी या मुंबईत येत असतात. मात्र शहरात येणाऱ्या प्रत्येकाचाच मनसुबा चांगला असेलच असं नाही. कारण, गांजा आणि सोनं तस्करी करणाऱ्या अनेक मंडळींनी शहरात शिरकाव केल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या असून, मुंबई विमानतळावर अशीच आणखी एक घटना घडली.
मुंबई विमानतळावर गांजा तस्करी करणारी मॉडेल अटकेत…
प्राथमिक माहितीनुसार बँकॉकहून मुंबईत हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केल्याप्रकरणी 28 वर्षीय मॉडेल हर्षा सनी हिला एअर इंटेलिजन्स युनिटकडून (AIU) अटक करण्यात आली. यंत्रणांनी जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची अंदाजे किंमत 11 कोटी 82 लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती आहे.
हर्षा सनी ही 2025 मधील ‘मिसेस केरळ’ सौंदर्य स्पर्धेतील स्पर्धक असून, ती 10 – 11 जूनच्या मध्यरात्री एअर इंडियाच्या TG-351 विमानाने बँकॉकहून मुंबई विमानतळावर दाखल झाली होती. एका नजरेत यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला आणि याच संशयाच्या आधारावर अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली. या तपासणीदरम्यान तिच्या ट्रॉली बॅगेतून 12 व्हॅक्यूम-सील पॅकेट जप्त करण्यात आले. ज्यामध्ये हिरव्या रंगाचा संशयास्पद पदार्थ आढळून आला.
एनडीपीएस चाचणी किटद्वारे तपासणी केल्यानंतर हा पदार्थ कॅनाबिसच्या सुक्या फुलांच्या आणि फळयुक्त कळ्यांचा असून तो हायड्रोपोनिक वीड (गांडा) असल्याचं निष्पन्न झालं. एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत कस्टम विभागाने हर्षा सनी हिला अटक केली. ज्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता किल्ला न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली.
एनडीपीएस विभागानं सनीवर अटकेची कारवाई केली. दरम्यान, सनीकडून ताब्यात घेण्यात आलेला हायड्रोपोनिक प्रकारचा गांजा हा अतिशय महागडा प्रकार मानला जातो. जो, पारंपरिक पद्धतीनं न उगवता त्याच्या लागवडीसाधी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. जिथं नियंत्रित वातावरणात हा गांजा उगवला जातो. या गांजामध्ये टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (THC) नावाच्या मादक घटकाचं प्रमाण 30 ते 40 टक्के इतकं असू शकतं, जे सामान्य गांजाहून 10 पट अधिक असल्यानं त्यात नशेचा प्रभाव अधिक तीव्र असतो, ज्यामुळं या गांजाला अमली पदार्थांच्या बाजारात बरीच मागणी असल्याचं म्हटलं जातं.
