लोणावळ्यात पर्यटकांचं अपहरण करणाऱ्या पोलिसांना दणका! एकाचं निलंबन, तर 5 जणांना…; 5 लाखांची मागितली होती खंडणी

Share This:

लोणावळा पर्यटनस्थळी पर्यटकांनाच खंडणीसाठी लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत पर्यटकाकडे तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, या प्रकरणातील एका पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आलं आहे. तर दोन पोलीस अंमलदार, दोन होमगार्ड आणि एका ट्रॅफिक वॉर्डनला न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोणावळा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला अंमली पदार्थ बाळगल्याचा संशय व्यक्त करत कारवाईची भीती दाखवून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी भूषित उमेश शर्मा 5 जुलै रोजी मित्रांसह चारचाकी वाहनातून लोणावळा येथे फिरण्यासाठी आले होते. यावेळी आरोपींनी त्यांना अमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणातील पोलीस अंमलदार अमोल महादेव ननावरे यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, पोलीस अंमलदार अमोल ननावरे, तुषार डावरे, होमगार्ड तुषार घाडगे, किसन बोंबले आणि ट्रॅफिक वॉर्डन नितेश चव्हाण यांना न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे..