गंगापूर धरणाच्या सावरगाव येथील बॅक वॉटरमध्ये बुडून गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच परिवारातील चार भावंडांचा समावेश आहे. हे सर्व तरुण सावरगाव येथील असून, विवाहिता तळेगाव अंजनेरीची आहे. मृतांमध्ये गणेश सुरेश गोतरणे (वय १६), साहिल मनोहर गोतरणे (१६), निखिल मच्छिंद्र गोतरणे (१६, तिघेही रा. सावरगाव), मयुरी पवन जाधव (वय २१, रा. तळेगाव अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर) या भावंडांचा समावेश आहे.
रूपाली धनगर (वय १७, रा. तळेगाव अंजनेरी) या बुडणाऱ्या मुलीला वाचविण्यात पवन जाधव यांना यश आले, मात्र पत्नी मयुरी यांना ते वाचवू शकले नाहीत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. मृत तरुण एकमेकांचे चुलतभाऊ असून, ते एकुलते आहेत. मयुरी ही त्यांची बहीण असून, धोंड्याच्या जेवणासाठी गोतरणे परिवाराने तिला निमंत्रित केल्याचे समजते. दुपारी जेवण आटोपल्यावर ही भावंडे सावरगाव बॅक वॉटर परिसरात गेली होती. त्यापैकी एक जण पाण्यात उतरला.
कंबरेएवढ्या पाण्यात गेल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने उडी घेतली. मात्र, तोही बुडू लागला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चारही जण बुडाले. रूपालीने बुडताना आरडाओरड केल्याने स्थानिक मदतीसाठी धावले. यात फक्त रूपाली वाचली. गेल्या महिन्यात २६ मेस कश्यपी धरण परिसरात दाम्पत्यासह दोन भावांचा बुडून मृत्यू झाला होता. पंधरा दिवसांत ही दुसरी घटना आहे.
तर दुसरीकडे, अकोला मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर गावाजवळून वाहणाऱ्या काटेपूर्णा नदीत तीन महिलांसह एक दहा वर्षीय बालक बुडाला. यातील दोन महिलांना वाचविण्यात यश आले तर मायलेकाचा मृत्यू झाला. वृषाली हरिदास खोत व त्यांचा मुलगा स्वराज, अशी मृतांची नावे आहेत. अधिक मासनिमित्त वृषाली, स्वराज या मायलेकांसह माधुरी खोत, मीरा चौधरी असे चौघे काटेपूर्णा नदीवर आंघोळीसाठी गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही गटांगळ्या खाऊ लागले. हे पाहताच काठावरील लोक धावून आले. त्यांनी माधुरी आणि मीरा यांना वाचविले. मात्र वृषाली आणि स्वराजचा बुडून मृत्यू झाला.
