कॅबमध्ये ओळख, बदलापूरची विवाहिता आणि चालकाची बॉडी गाडीत सापडली, लहान मुलाने गाडीतून उतरुन नातेवाईकांना सांगताच हलकल्लोळ

Share This:

बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्युवेली गावाजवळ गुरुवारी दुपारी एक महिला आणि ॲपआधारित कॅब चालकाचे शव पार्क केलेल्या गाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृत महिलेचा तीन वर्षांचा मुलगा या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असून, चालकाने आपल्या आईवर चाकूने अनेक वार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे चालकाने आधी महिलेची हत्या करून नंतर स्वतःवर वार करून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत महिला काही महिन्यांपूर्वी घाटकोपरहून ओला कॅबने बदलापूरला जात असताना या दोघांचा परिचय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली

लहान मुलगा महत्त्वाचा दुवा

मृत महिला दोन वर्षांपासून कुटुंबासह बदलापूर येथे राहत होती. घरापासून सुमारे दीड किलोमीटरवर तिची बॉडी आढळली. घटनेवेळी गाडीत असलेल्या लहान मुलाने बाहेर पडून जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना कळवल्यानंतर ही घटना उजेडात आली. आईचा गाडीत मृत्यू झाल्याचे सांगत त्याने नातेवाईकांना गाडीपर्यंत आणले. त्यावेळी सर्वांना महिलेसोबत एका पुरुषाचेही पार्थिव दिसले. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

 

कॅबमध्ये महिलेची चालकाशी ओळख

महिलेसोबत मृतावस्थेत आढळलेल्या कॅब चालकाचे नाव गणेश शिंदे असून, तो घाटकोपर येथील रहिवासी होता. मृत महिला काही महिन्यांपूर्वी घाटकोपरहून ओला कॅबने बदलापूर येथे येत असताना या दोघांचा परिचय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलेचा पती घाटकोपर येथे चहाचे दुकान चालवतो, तर गणेशच्या आईचाही घाटकोपर येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. मात्र, हत्येच्या दिवशी दोघे घटनास्थळी एकत्र कसे पोहोचले व या घटनेमागील नेमके कारण काय, याचा उलगडा लगेचच होऊ शकला नाही.

नातेवाईकांनाही दोघांचं नातं सांगता येईना

दोघांच्या बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवले असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत अधिक तपशील हाती येईल, असे पोलिसांनी सांगितले. मुलासमोरच गणेशने महिलेवर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेचे गणेशही काय नाते आहे, हे तिच्या नातेवाईकांनाही सांगता आले नाही