हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत व नाशिक तालुक्यातील रहिवासी असलेली आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन बेपत्ता मुलगी प्रत्यक्षात विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीची विक्री करणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या जाळ्यात आली असून, १० संशयिताना जेरबंद केले आहे.
संशयितांमध्ये तुषार पाटीलबा पचपिंड (वय २९), संदीप पचपिंड (४०), विशाल परचंडे (३३), महादेव साहेबराव नाईकवाडे (चौघे रा. कौठे मलकापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), सुरेश नवसू फसाळे (४६), कमल सुरेश फसाळे (३५), धर्मा नवसू फसाळे (४०, तिघे रा. गंगाम्हाळुंगी, ता. जि. नाशिक), सीता पुंडलिक बेंडकोळी (३८, रा. वेळे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), ठकूबाई लक्ष्मण माळेकर (६०, रा. सारस्ते, ता. पेठ, जि. नाशिक), सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे (४५, रा. सहाणे मळा, मु. पो. वरवंडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी गावातील १६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मुलीला आई नाही. तिच्या वडिलांनी सर्वत्र शोध घेऊन अखेर हरसूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत शोध घेतला असता परिसरातील कोणताही तरुण बेपत्ता नसल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.
पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक विमला एम., उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुलीचा शोध घेत टोळीचा पर्दाफाश केला. आमदार हिरामण खोसकर यांनी आणखी किती मुलींची विक्री झाली याच्या तपासाची मागणी केली आहे.
दोन लाखांत सौदा
आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलीला मोबाइल फोनचे आमिष दाखून तिला पळवून नेले. संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर गावात तुषार पाटीलबा पचपिंड (वय २९) याच्याशी या मुलीचा अल्पवयीन असतानाही विवाह लावून दिला. या प्रकरणात संदीप पचपिंड, सोन्याबापू पाटोळे, विशाल परचंडे, महादेव नाईकवाडे यांनी प्रयत्न केले, तर गंगाम्हाळुंगीतील सुरेश फसाळे, कमल फसाळे, ठकूबाई माळेकर यांनी दलालीचे काम केले. फसाळे, माळेकर यांनी यासाठी दोन लाख रुपये घेतले. त्यापैकी काही रक्कम रोख स्वरूपात, तर काही रक्कम ‘फोन पे’द्वारे दिली. अन्य संशयितांनी मुलीला लपवून ठेवले.
