सुरुवातीला हाय-हॅलो, आभासी दुनियेत मैत्रीण मिळाली, ‘तिने’ आधी मन जिंकलं, मग केला मोठा कारनामा; नाशिकमध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला लाखोंचा गंडा

सेवानिवृत्त झाल्यानंतर निवांत जगण्याच्या दिवसांत अचानक मोबाईल स्क्रीनवर ‘फ्रेंडशिप रिक्वेस्ट’ येते. प्रोफाइलवर पश्चिम बंगालच्या एका बड्या कंपनीची तरुण महिला ‘सीईओ’, नाव अंजली अग्रवाल! सुरुवातीला हाय-हॅलो, मग कौटुंबिक गप्पा, आवडीनिवडी आणि हळूहळू वाढलेली जवळीक. आयुष्याच्या उत्तरार्धात आभासी दुनियेत मैत्रीण मिळाली, परंतु त्यामागे ‘सायबर हनी ट्रॅप’ होता. त्यामुळे एका रात्रीत सेवानिवृत्तासह तिघांची आयुष्याची पुंजी फस्त झाली. याप्रकरणी शहर सायबर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीशी मैत्री करुन जास्त नफ्याच्या आमिषाला बळी पडणे एका सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. सेवानिवृत्त वृद्धासह एकूण तिघांची ३७ लाख ९१ हजार ३६४ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी येथील सेवानिवृत्त व्यक्तीला जुलै २०२५ मध्ये फेसबुकवर ‘अंजली अग्रवाल’ नावाच्या खात्यावरुन फ्रेंडशिप रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. महिलेने स्वत:ला एका कंपनीची सीईओ आणि पश्चिम बंगालची रहिवासी असल्याचे सांगितले. पुढे त्यांच्यात व्हॉट्सॲपवर संवाद सुरु झाला. संबंधित महिलेने ‘नंबर ट्रेडिंग’ व्यवसायातून मोठा नफा कमावत असल्याचे सांगितले. वृद्धाला काही बनावट स्क्रीनशॉट पाठवले. तिच्या सांगण्यावरुन वृद्धाने कथित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या लिंकवर बँक खाती, पॅन कार्ड आणि आधार कार्डची नोंदणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या ‘यूपीआय आयडी’ आणि बँक खात्यांवर ऑगस्ट ते डिसेंबर २०२५ या कालावधीत साठपेक्षा जास्तवेळा आर्थिक व्यवहार झाले.

वृद्धाने बँकेच्या दोन वेगवेगळ्या खात्यांमधून एकूण २७ लाख ५६ हजार १६४ रुपये संशयितेच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, अल्पावधीतच फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वृद्धाच्या तक्रारीवरुन नाशिक शहर सायबर पोलिसांत भारतीय न्याय संहित २०२३च्या कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००च्या कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित व्हॉट्सॲप क्रमांक आणि ज्या बँक खात्यांवर फसवणुकीची रक्कम वर्ग झाली, त्या खातेदारांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

साडेचार कोटींचा खोटा नफा

संशयितेच्या बँक खात्यात पैसे जमा केल्यावर काही दिवसांनी संबंधित डिजिटल वेबसाइटवर वृद्धाला तब्बल साडेचार कोटी रुपयांचा नफा झाल्याचे भासविण्यात आले. वृद्धाने जेव्हा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या शुल्कापोटी आणखी पैशांची मागणी करण्यात आली. वृद्धाने नफ्याच्या रकमेतूनच हे शुल्क वजा करण्याची विनंती केली. मात्र, ती फेटाळून लावत पूर्ण पैसे भरल्याशिवाय रक्कम मिळणार नसल्याचे संशयितांनी सांगितले.

किती रुपयांचा गंडा?

सेवानिवृत्ताला २७ लाख ५६ हजार १६४ रुपयांचा गंडा

आणखी एकाला ५ लाख १५ हजार २०० रुपयांना लुटले

अंबडच्या महालक्ष्मीनगरातील एकाची ५ लाख २० हजारांची फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *