2 ते 4 जुलै तुफान पाऊस पडणार, हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट जारी

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. विदर्भात आतापर्यंत ४० ते ६० टक्क्यांपर्यंत पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. मान्सूनही यंदा साधारण आठ ते दहा दिवस उशिराने दाखल झाल्याने पावसाचे प्रमाण घटले. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 2 जुलैपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल निनोचा प्रभाव सध्या स्पष्टपणे जाणवत आहे. सामान्यतः जून महिन्यात राज्यात मान्सून सक्रिय होऊन अनेक भागांत मुसळधार पाऊस पडतो. मात्र, यंदा अल निनोमुळे वातावरणातील बदलांमुळे पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राहिले. विदर्भात अनेक ठिकाणी ५० ते ६० टक्के तर सरासरी ४० टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे.

१२५ मिमी ते १४० मिमीपर्यंत पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली तयार होत असून तिचा मार्ग विदर्भातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २ ते ४ जुलैदरम्यान संपूर्ण विदर्भात पावसाची तीव्रता वाढणार असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत १२५ ते १४० मिमीपर्यंत पाऊस होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *