श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे केली. काश्मीर दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी नायब राज्यपाल सिन्हा यांची भेट घेतली. त्या वेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करीत महाराष्ट्र भवनाची संकल्पना त्यांना सांगितली तसेच जागेच्या मागणीचे पत्रही दिले. पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची कला, खाद्य आणि संस्कृतीची झलकदेखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि काश्मीरशी नाते दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल, असेही शिंदे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
