जून महिन्यापासून बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरु असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिंदेंनी नवा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची महाविकास आघाडीने पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनी ही मागणी मान्य करुन ती यादी मागे घेतल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. हा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील सदस्य पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीकडून पाठवण्यात आलेली राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी मागे घेण्यासाठी पत्र लिहिलं. महाविकास आघाडीने राज्यपाल कोश्यारींना २० नावं पाठवली होती. हीच यादी मागे घेण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली. राज्यपालांनी या मागणीनुसार ही यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजपाकडून राज्यपालांना नवी यादी दिली जाणार आहे. म्हणजेच विधानपरिषदेमधील राज्यपाल नियुक्त १२ आमदार कोण असतील हे आता शिंदे गट आणि भाजपा ठरवणार आहे.
