मुंब्रा डोंगरावरील तीन ते चार फूट आकारमानाचा एक प्रचंड दगड शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास डोंगर उतारावरून घरंगळत दोन घरांवर कोसळला. यामध्ये कविता वानपसरे (३५) या महिलेचा मृत्यू झाला. डोंगरावरील अन्य दगडांची स्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या भागातील १४ घरे रिकामी करण्यात आली आहेत. त्यांची व्यवस्था जवळच्या ठाणे महापालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे.
मुंब्रा बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असून या भागात दरड कोसळण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत असल्याने डोंगर उतारावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास रोडवरील लाल किल्ला ढाब्याजवळ डोंगरावरून एक अवाढव्य दगड दोन घरांवर कोसळला. साईकृपा चाळीतील सुनिल वानपसारे यांच्या व गजराज सोसायटी चाळीतील मारुती सूर्यवंशी यांच्या घरावर हा दगड कोसळल्याने या दोन्ही घरांचे फार नुकसान झाले. यामध्ये कविता वानपसरे यांचा मृत्यू झाला.
