शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजदेयकांमधून थकबाकीमुक्तीसाठी ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत संधी आहे. ‘कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०’ मधून मूळ थकबाकीमध्ये ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ५५४ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. त्यातील ७० हजार २३४ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजदेयक निरंक केले आहे.
दरम्यान, पुढील तीन महिन्यांमध्ये थकबाकीमुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. या योजनेच्या लाभासाठी आता काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजदेयकांच्या दुरुस्तीसह सर्व प्रकारचे कार्यालयीन सहकार्य जलदगतीने देण्यात येत आहे. सुधारित थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी ३१ मार्चपूर्वी थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे. चालू वीजदेयक व थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून वीजदेयक कोरे करावे तसेच कृषी आकस्मिक निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्र व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकासकामांना हातभार लावावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालकांनी केले आहे.
