नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी मुंबईत सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Rave Party) छापा टाकला. याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांची रविवारी संध्याकाळपर्यंत चौकशी करण्यात आली त्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सर्व आरोपींना अटक करण्यात आली. आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी करण्यात आली.
यावेळी आर्यन खानसह 3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात आर्यन व्यतिरिक्त अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचासह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या फोनवरून संशयास्पद व्यवहारांचाही उल्लेख आहे. तसंच, ड्रग्स खरेदीसाठी अनेक कोड नेम वापरले गेले आहेत.
एनसीबीने मागितली होती कोठडी
एनसीबीने न्यायालयाकडून आरोपींची 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. सुनावणीदरम्यान एनसीबीने आर्यन खानच्या फोनमध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह फोटोबद्दल सांगितलं. यासह अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन देण्यास नकार दिला आणि एनसीबीला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली.

