आसाम हिंसाचार : पोलिसांना नागरिकांवर थेट गोळीबाराचे आदेश कुणी दिले?

भारताच्या पूर्वेकडील आसाम राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडलीय. दरांग जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांसमोर अर्धमेल्या अवस्थेतील व्यक्तीला मारहाण करणाऱ्या एका पत्रकारालाही अटक करण्यात आलीय. या घटनेनंतर आसाममधील भाजप सरकार आणि प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

आसामच्या दरांग जिल्ह्यातील ढालपूर भागात अतिक्रमणाविरोधात राज्य सरकारकडून मोहीम सुरू आहे. गुरुवारी, सरकारनं अवैध केलेलं अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. हा विरोध दाबवण्यासाठी पोलिसांकडून नि:शस्त्र ग्रामस्थांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन ग्रामस्थ ठार झाल्याची माहिती मिळतेय.

दोन ग्रामस्थांचा मृत्यू, नऊ पोलीस जखमी

पोलीस आणि स्थानिक नागरिकां दरम्यान घडलेल्या या हिंसाचाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता व्हिडिओ प्रसारीत करता येणार नाही. परंतु, या व्हिडिओत पोलिसांच्या गोळीबारानंतर अर्धमेल्या अवस्थेत असणाऱ्या एका व्यक्तीसोबत अमानवीय वर्तवणूक करण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. या व्हिडिओत दिसत असलेल्या दृश्यानुसार, एक ग्रामस्थ काठी घेऊन पोलिसांकडे चालून येताना दिसत आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हा व्यक्ती जखमी होऊन जमिनीवर पडला. त्यानंतरही पोलीस कर्मचारी त्याच्यावर काठ्यांची बरसात करताना दिसत आहेत.

पत्रकाराकडून अर्धमेल्या व्यक्तीला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

इतकंच नाही, तर या घटनेच्या वार्तांकनासाठी घटनास्थळी उपस्थित असलेला एक कथित कॅमेरामन – पत्रकारही बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर लत्ताप्रहार करताना तसंच गुडघ्यानं जखमी व्यक्तीचा गळा दाबत त्याला मारहाण करताना दिसून येतोय. यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून बाजुला हटवलं.

या घटनेत नऊ पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती दरांगचे पोलीस अधीक्षक सुशांत बिस्वा सरमा यांनी दिलीय. गावकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *