महिला सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचं पाऊल, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘निर्भया पथका’ची स्थापना

साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली असून अशा घटना टाळण्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्भया पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहे. या निर्भया पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, एक महिला तसंच एक पुरुष अंमलदार आणि एक ड्रायव्हर अशा मनुष्यबळाचा समावेश असेल.

शाळा, महाविद्यालयं आणि नोकरी निमीत्ताने घराबाहेर असणाऱ्या मुली आणि महिलांची प्रत्यक्ष किंवा फोन कॉल्स, मॅसेज, ई-मेल व इतर सोशल मिडीयाचा वापर करूण छेड काढली जाते. समाजामध्ये महिलांविषयी आदरयुक्त भावना निर्माण करण आणि कायद्याची भीती निर्माण करणे या उद्देशाने तसंच महिलांवर होणाऱ्या अत्याचार, छेडछाडीचं समुळ उच्चाटन होण्यासाठी “निर्भया” पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

तसंच मुंबई पोलीस दला मार्फत ‘एम पॉवर’  या संस्थेच्या सहभागातुन “सक्षम” हा उपक्रम महिलांविरुध्द गुन्हयातील पीडीत महिला, पोस्को कायद्यातर्गत गुन्हयातील पीडीत, अल्पवयीन मुले, मुली यांना मानसीक दृष्ट्या सशक्त करण्याकरीता तसंच विधीसंघर्ष ग्रस्त बालके यांना योग्य मार्गदर्शन, गुन्हयांपासून परावृत्त करण्यासाठी मानोसपचार तंज्ज्ञांकडुन समुपदेशन करण्याकरीता राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *