विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महानगरपालिका क्षेत्रात पाचवे सेरो सर्वेक्षण (Sero survey) अर्थात रक्त नमुन्यांची चाचणी करुन अॅण्टीबॉडीज् (Antibodies) शोधण्याबाबतचं सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणानुसार, एकूण 86.64 टक्के नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज् दिसून आले आहेत. कोविड लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी Anitbodies विकसित झालेल्यांची संख्या 90.26 टक्के तर लसीकरण न झालेल्यांपैकी 79.86 टक्के नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज् आढळली आहेत.विशेष म्हणजे, मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत झोपडपट्टी तसंच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये देखील अॅण्टीबॉडीज् विकसित होण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्षही यातून समोर आला आहे.
दरम्यान, अॅण्टीबॉडीज् आढळले तरी ते किती प्रमाणात सुरक्षितता प्रदान करतील, याची वैद्यकीय हमी देता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी ढिलाई न करता, कोविड विषाणू संसर्ग होवू नये म्हणून मास्कचा योग्य उपयोग, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर इत्यादी कोविड अनुरुप वर्तणूकीचे पालन करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.कोविड-19 विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोविडच्या प्रसाराबाबत निश्चित अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध करून घेणे गरजेचं असतं. याचाच एक भाग असलेल्या सेरो सर्वेक्षणामध्ये रक्त नमुने घेऊन त्यातून अॅण्टीबॉडीज् अस्तित्वात आहेत किंवा कसे, याचा अभ्यास केला जातो.
महानगरपालिकेचे दवाखाने तसंच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱया विविध समाज घटकातील रुग्णांचा यामध्ये समावेश होता. अशा रितीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 प्रशासकीय विभागात मिळून एकूण 8 हजार 674 नागरिकांचं रक्त नमुने संकलित करुन त्याची चाचणी करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची माहिती नोंदविण्यासाठी मोबाईल अॅप्लीकेशनचा उपयोग करण्यात आला तसेच सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची संमती देखील घेण्यात आली.
