डोक्यावर पांढरे झालेले केस, बारीक अंगकाठी असलेली एक महिला फिकट निळ्या नाईटगाऊनमध्ये पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बाराबाजार भागात डनलॉपच्या रस्त्यावर फिरत आहे. ती महिला रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून खायला काहितरी घेते आणि तिथेच फुटपाथवर झोपते. ही महिला पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मेहुणी इरा बासू असल्याची माहिती समोर आली आहे. भट्टाचार्य १० वर्षांहून अधिक काळ बंगालचे मुख्यमंत्री राहिले आहेत. इरा बासू या बुद्धदेव यांच्या पत्नी मीराच्या बहीण आहेत.
इरा बासू यांनी विषाणूशास्त्रात पीएचडी केली असून त्या इंग्रजी आणि बंगाली दोन्ही अस्खलितपणे बोलू शकतात. त्या टेबल टेनिस आणि क्रिकेट खेळायच्या आणि राज्यस्तरीय खेळाडू देखील राहिल्या आहेत. इरा बासू या पूर्वी पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील प्रियनाथ गर्ल्स हायस्कूलमध्ये जीवनशास्त्र शिक्षिका होत्या. त्या बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पत्नी मीरा यांच्या बहीण असून गेल्या दोन वर्षांपासून फुटपाथवर राहत आहेत.
इरा बासू १९७६ मध्ये जीवनशास्त्र शिक्षिका म्हणून प्रियनाथ गर्ल्स हायस्कूलमध्ये रुजू झाल्या आणि २००९मध्ये त्यांनी नोकरी सोडली. त्यावेळी बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी, त्या बारानगरमध्ये राहत होत्या. त्यानंतर खर्डामधील लिचू बागान भागात गेल्या आणि काही दिवसांनी त्या राहत होत्या तिथून बेपत्ता झाल्या. नंतर त्या कोलकात्याजवळच्या डनलॉपच्या रस्त्यांवर फिरताना दिसू लागल्या. इंडिया टूडेने याबद्दल माहिती दिली आहे.
प्रियनाथ शाळेच्या मुख्याध्यापिका कृष्णाकाली चंदा म्हणाल्या, “इरा बसू इथे शिकवायच्या. निवृत्तीनंतर पेंशनसाठी आम्ही त्यांना कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. पण त्यांनी ते न दिल्याने त्यांना पेंशन मिळत नाही. इरा बासूला इतर शाळांमध्ये शिकवण्याची संधी होती पण त्यांनी ३४ वर्षे प्रियनाथ गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून शिकवणे पसंत केले,” असेही त्या सांगतात.
बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या कुटुंबाशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल इरा बासू म्हणाल्या, “मला त्यांची नातेवाईक असल्यामुळे कोणतीही गोष्ट मिळवायची नव्हती, त्यामुळे मी शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाले. मी जे मिळवलं ते स्वतःच्या जिद्दीने. लोकांना माझे माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी असलेले संबंध माहीत आहेत. मात्र, मला व्हीआयपी ओळख नको आहे.”
दरम्यान, इरा बासू या फुटपाथवर राहत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्यांना गुरुवारी डनलोप परिसरातून बरानगर पोलीस ठाण्यात नेण्यासाठी खर्डा नगरपालिकेची रुग्णवाहिका पाठवली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी कोलकाता येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

