केरळातल्या तिरुवनंतरपुरम इथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका दहावीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या सोशल मीडियावरच्या मित्राला आपल्या घरातून तब्बल ३७ लाख रुपयांचं सोनं गिफ्ट म्हणून दिलं आहे. एकूण ७५ तोळे सोनं तिने तिच्या मित्राला दिलं आहे.
या वृत्तानुसार, एका वर्षापूर्वी शिबीन नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती की तो सध्या आर्थिक संकटात आहे. ही पोस्ट पाहून १५ वर्षीय विद्यार्थिनीने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्यातून हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. शिबीनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचं समजत आहे.
या मुलीच्या घरात अंथरुणांच्या खाली लपवून ठेवलेल्या एका डब्यात हे सोनं होतं. या विद्यार्थिनीने ७५ तोळे सोनं आपल्या या सोशल मीडियावरच्या मित्राला दिलं आहे. आपल्या आईच्या मदतीने शिबीनने हे सोनं विकलं आणि त्यानंतर त्या दोघांनी आपल्या घराची दुरुस्ती केली. उरलेली ९ लाख रुपयांहून अधिक रक्कम घरात ठेवली.
सोनं गायब झाल्यानंतर या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर शिबीन आणि त्याची आई शाजिलाला अटक करण्यात आली. त्यावेळी या मुलीने घडलेला प्रकार उघड केला आणि आपणच त्याला सोनं दिल्याचं कबूल केलं. पोलिसांना शिबीनच्या घरात साधारण १० लाख रुपये सापडले आहेत.
पण पोलिसही चक्रावले कारण…
मात्र खरा ट्विस्ट तर तेव्हा आला की जेव्हा शिबीनने पोलिसांना सांगितलं की त्याला ७५ तोळे सोनं मिळालेलंच नाही. या मुलीने त्याला केवळ २७ तोळे सोनं दिलं आहे. या प्रकारामुळे पोलिसही सध्या गोंधळलेले आहेत. या विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलं की या ७५ तोळ्यांपैकी ४० तोळे सोनं तिने पलक्कड जिल्ह्यातल्या दुसऱ्या एका तरुणाला दिलं, ज्याच्याशी तिची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. या युवकाने सोनं मिळताच या मुलीला ब्लॉक केलं, असंही ती म्हणाली. पण पोलीस तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
