राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. उमेदवारांना आणखी एक दिलासा दिला आहे. पीएच.डी. मार्गदर्शकांच्या कमतरतेच्या समस्येवर मात करण्यासाठी नागपूर विद्यापीठाने नवीन नियम लागू केला आहे. मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शकाच्या महाविद्यालयाला संशोधन केंद्राचा दर्जा नसल्यास अशा मार्गदर्शकास नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात नोंदणी करून उमेदवारांना मार्गदर्शन करता येईल.
विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. मात्र, अनेक संशोधकांना मार्गदर्शक मिळत नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतात. अनेकांना संशोधन करायचे असतानाही त्यांना मार्गदर्शक मिळत नसल्याने संशोधनापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने आता पीएच.डी. मार्गदर्शकांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार विद्यापीठाकडे त्या विषयाचा पदव्युत्तर विभाग नसल्यास अशा पर्यवेक्षकांना तो विषय असणाऱ्या कुठल्याही पदव्युत्तर विभाग असलेल्या महाविद्यालयातील संशोधन केंद्रात जाऊन नोंदणी करता येणार आहे. नागपूर विद्यापीठाने नुकतेच या नियमांसंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. त्याअंतर्गत प्राध्यापक स्तरावरील पर्यवेक्षकांना ८ पीएच.डी. उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सहयोगी प्राध्यापकांना ६ आणि सहाय्यक प्राध्यापकांना ४ उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पीएच.डी. उमेदवारांचे मार्गदर्शक बनण्यासाठी विद्यापीठाद्वारे पीएच.डी. असणे, पाच वर्षांचा अनुभव असणे आणि पाच शोधप्रबंध प्रकाशित असणे आवश्यक ठरणार आहे.
