करोना केंद्राच्या नावाखाली आर्थिक लूट

एखाद्या रुग्णावर उपचार करण्यापासून तो बरा होईपर्यंत डॉक्टर त्यांची काळजी करतात. मात्र करोना महामारीने वैद्यकीय सेवेला व्यवसायाचे स्वरूप आले आहे. शहरातील काही नामांकित डॉक्टरांनी करोना केअर सेंटर सुरू करून परिचारिका, शिकाऊ डॉक्टरांच्या नियुक्त्या करून हा व्यवसाय धडाक्यात सुरू केला आहे.

जिल्ह्य़ात करोना महामारी अतिशय वेगाने पसरत आहे. त्या तुलनेत आरोग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे. प्राणवायू, व्हेंटिलेटरवर खाट मिळणे तसेच रेमडेसिविर इंजेक्शन सहज उपलब्ध होणे शक्य नाही. याच संधीचा फायदा घेत शहरातील काही डॉक्टरांनी अक्षरश: वैद्यकीय सेवेचा व्यवसाय करून टाकला आहे. शहरात ४६ फिजिशियन डॉक्टर आहेत. यातील काही बोटावर मोजता येतील इतके डॉक्टर सोडले तर अनेकांनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. वरोरा नाका चौकात एका डॉक्टरने ६० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले. येथे १.५० ते २ लाख रुपये रुग्णाला आधी जमा करण्यास सांगितले जाते. त्यानंतर भरती करून घेतले जाते. या डॉक्टरने काही शिक्षित डॉक्टर हाताशी ठेवले आहेत. ९० पर्यंत प्राणवायू असेल तरच त्याला भरती केले जाते. गंभीर रुग्ण परत पाठवले जातात. किंवा रुग्ण गंभीर झाला तर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात जबरदस्तीने पाठवले जाते. भाजपचा प्रमुख पदाधिकारी असलेल्या एका डॉक्टरने सेंट मायकल शाळेजवळ एक सदनिका भाडेतत्त्वावर  घेतली आहे. तिथे १०० खाटाचे कोविड रुग्णालय सुरू केले. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर हा तिथे रुग्णावर उपचार करीत नाही अशा तक्रारी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या. त्याने या रुग्णालयाची जबाबदारी एक डॉक्टर व परिचारिका यांच्यावर सोपवली आहे. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टरने शहरातील आणखी सहा हॉस्पिटलची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणाऱ्या एका डॉक्टरने शहराच्या बाहेर एका आयुर्वेद महाविद्यालयात १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. या डॉक्टरचे शहरात जयंत टॉकिजच्या मागे रुग्णालय आहे. तिथेही करोना रुग्ण दाखल आहेत. हा डॉक्टरसुद्धा लाखो रुपये उकळत असल्याच्या तक्रोरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *