अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण होत असल्याने चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी हे चक्रीवादळ पोषक स्थिती निर्माण करू शकते. मात्र, त्याचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मोठा धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.

मोसमी वारे यंदा १ जूनला नियोजित वेळेतच भारतात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला होता. पावसाच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये देशात ९८ टक्के म्हणजे समाधानकारक पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मोसमी वाऱ्यांचे आगमन आता सुमारे तीन आठवडय़ांवर आले आहे. याच काळात मोसमी वाऱ्यांना प्रवाहीत करणारी पोषक स्थिती अरबी समुद्रात निर्माण होत आहे.

दक्षिण-पूर्व  अरबी समुद्रात चक्रावाताची स्थिती निर्माण होणार असून, कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १४ मेपासून ही स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी दाबाच्या तीव्र क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. १५ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन १६ ते १७ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने जाणार असल्याने त्याचा महाराष्ट्रातील किनारपट्टीवर मोठा परिणाम होणार नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी याच काळातमध्ये अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *