भिवंडीत बसगाडी चोरणारे अटकेत

ठाणे : भिवंडी येथील कोनगाव भागात बसगाडी चोरणाऱ्या चौघांना कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. रमीज सैय्यद (२६), आलीम अन्सारी (३४), मोजिम अन्सारी (४६) आणि रुस्तम अन्सारी (३९) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून १८ लाख रुपये किमतीची बसगाडी जप्त केली. बसगाडीमध्ये असलेल्या ‘जीपीएस ट्रॅकर’ या यंत्रणेच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांना शक्य झाले.

माजीवडा येथे राहणाऱ्या राजेश पुजारी यांनी शुक्रवारी मध्यरात्री त्यांची बसगाडी मुंबई-नाशिक महामार्गालगत उभी केली होती. शनिवारी सकाळी ते पुन्हा बसगाडी आणण्यासाठी गेले असता त्यांची बस गायब असल्याचे दिसले. याप्रकरणी त्यांनी कोनगाव पोलीस ठण्यात तक्रार दाखल केली. या बसगाडीमध्ये जीपीएस ट्रॅकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या बसगाडीचे सध्याचे स्थळ शोधण्यास सुरुवात केले. त्यावेळी ही बसगाडी भिवंडीतील मानकोली भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने नारपोली पोलिसांच्या मदतीने या बसगाडीचा शोध घेऊन बसगाडी अडविली. आणि चौघांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *