पुरेशा लससाठ्या अभावी आजपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण (Mumbai Vaccination) बंद राहणार आहे. उपलब्ध लससाठा संपुष्टात आल्याने आज, उद्या आणि परवा म्हणजे 2 मेपर्यंत असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. 1 मेपासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे होणारे लसीकरण पुरेशा लससाठ्या अभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यानच्या कालावधीत, महानगरपालिकेला लससाठा प्राप्त झाला आणि लसीकरण सुरु होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल असं पालिकेने म्हटलंय. नोंदणीकृत पात्र व्यक्तिंनाच आता लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आलंय.
लसीकरणासाठी 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना काही केंद्रांवर रांगेत बराच वेळ उभे राहावे लागत आहे. या नागरिकांनी चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये. सर्वांचे लसीकरण होणार असे आवाहन पालिकेने केलंय.
पालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून 63 लसीकरण केंद्रांवर तर खासगी रुग्णालयात ७३ लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडे लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन दैनंदिन लसीकरण मोहिमेचे नियोजन प्रशासन करीत आहे.
