मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने दोघांनी मुंबईला नेले अन्…

अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे वडील दगावल्यानंतर पालनपोषण करू असे सांगून नेणाऱ्या नातेवाइकांनी तिची राजस्थानात विक्री केली. या प्रकरणात वाशीम शहर पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा छडा लावत सात आरोपींना अटक केली. सोबतच पीडितेची सुटका केली.

शहरातील वाल्मिकीनगरात राहणाऱ्या एका महिलेने वाशीम शहर पोलिस ठाण्यात १२ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार तिच्या बहिणीच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या ११ वर्षांची मुलगी घनश्याम पवार रा. हातगाव (जि.यवतमाळ) व जयेंद्र पवार रा. बोरी (जि. यवतमाळ) यांनी सोबत नेले होते. मात्र या मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने या दोन आरोपींनी मुंबईला नेले. त्यानंतर मुलीला राजस्थानात चार लाख रुपयांना विकले. मात्र, आपल्याला मुलगी न सांगता निघून गेल्याचे गावाकडे सांगितले. मुलीला राजस्थानमध्ये डागरा येथे विकल्यानंतर संदीप बांगडवा या ३३ वर्षीय व्यक्तीसोबत तिचे लग्न लावून दिले. मदन हनुमानसिंग बांगडवा, राकेश बांगडवा यांनी सदर मुलीचा छळ केला. या जाचाला कंटाळून सदर पीडितेने तेथून पळ काढून गुजरात गाठले. या घटनेबाबत बारडोली पोलिस ठाण्यात तिने आपबिती कथन केली. बारडोली पोलिसांनी वाशीम नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नंतर घनश्याम व जयेंद्र पवारला व सुभाष पवारला पालघरमधून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *