भिवंडीतील शांतीनगर, गैबीनर परिसरात नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी न करता करोनाचे बनावट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अहवाल ५०० रुपयांमध्ये देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने आणि त्यांच्या पथकाने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. ज्या लॅबमधून बनावट अहवाल देण्यात येत त्या गैबीनगर येथील महेफुज क्लिनिकल लॅबोरटरीममध्ये एका डमी व्यक्तीला पाठवले. या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब किंवा नमुने न घेता एका नामांकित लॅबचा लेटरहेडचा वापर करून करोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल देताना या लॅबमधील तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आणि लॅबोरटरीची घेतलेल्या झडतीमध्ये एकूण बनावट ६४ अहवाल पोलिसांच्या हाती लागले. यामध्ये ५९ अहवाल निगेटिव्ह तर ५ अहवाल पॉझिटिव्ह होते. या अहवालांविषयी ताब्यात घेण्यात आलेला लॅब टेक्निशियन इनामुलहक उर्फ रब्बानी तसेच लॅब व्यवस्थापनाचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांच्याकडे पोलिसांनी अत्यंत बारकाईने चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. लॅबमध्येच मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, संगणक, प्रिंटरच्या सहाय्याने करोनाचे बनावट अहवाल तयार करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच हे अहवाल लॅबचा मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यावरून तयार करण्यात येत होते, असेही उघड झाले.
