पनवेल पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या लाटेपूर्वी करोना प्रतिबंधकाच्या दोनही लशी घेतल्याने पनवेल पालिकेचे व पोलीस विभागाचे कर्मचारी दुसऱ्या लाटेत सूरक्षित असल्याचे उजेडात येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील आणि पनवेल पालिका कर्मचाऱ्यांच्या एकू ण बाधितांची संख्येमुळे ही बाब समोर आली आहे.
पनवेलमध्ये सुमारे १६ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यात १६० कर्मचारी आहेत. त्यापैकी दोनही लसींची मात्रा सुमारे १४५ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दुसऱ्या लाटेपूर्वीच घेतली होती. दुसऱ्या करोनाच्या लाटेत अवघ्या पाचजणांना करोनाची लागण झाली, मात्र लागण झालेल्यांनाही कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. तसेच, उपचारातून बरे होईपर्यंत कोणताही वैद्यकीय त्रास झाला नाही. मागील वर्षीच्या करोना लाटेत पन्नासहून अधिकांना करोनाची बाधा झाली होती. अशीच स्थिती पनवेल पालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची आहे.
सुमारे साडेसहाशे आस्थापनावरील कर्मचाऱ्यांची संख्या असलेल्या पालिकेत अवघे तीन ते चारजणांना दुसऱ्या लाटेत करोना झाला. मात्र, करोनाबाधितचा अहवाल आल्यानंतरही वैद्यकीय त्रास जाणवला नाही. ही बाब करोना युद्धातील सर्वच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी असली तरी मुखपट्टी वापरणे, सामाजिक अंतर पाळणे हे नियम पाळण्याविषयीचे आदेश संबंधित आस्थापनाच्या वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
पनवेलमध्ये लसीकरणाच्या पात्रतेनुसार एकू ण साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत ७०,४८९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याकडून येणाऱ्या अपुऱ्या लशींच्या पुरवठ्यामुळे रविवारी कोविशिल्ड २००० व कोवॅक्सीन १००० पनवेल पालिकेला मिळाल्या होत्या. दिवसाला अडीच हजार लशी पनवेल पालिका क्षेत्रात देण्याचे नियोजन पालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. तर पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे महणाले की, पोलिसांना दुसऱ्या लाटेतही रस्त्यावर थेट नागरिकांशी संपर्क करावा लागत आहे. मागील लाटेपेक्षा या लाटेत लसीकरणाचा लाभ झाल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस मुखपट्टी घालूनच कायदा व सुव्यवस्था राबवत आहे. मात्र यावेळी लसीकरणामुळे बाधितांची संख्या पोलिसांमधील कमी असल्याचे जाणवते. तसेच करोनाच्या लागणनंतरही त्रासही कमी झाला.
