शहरानं नाकारलं.. गावानं झिडकारलं..!

चांदवड तालुक्यातील धोडंबे गावातील एका वृद्धेला करोनाचा संसर्ग झाला होता. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड कक्षात चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांना करोनामुक्त करण्यासाठी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, या वृद्धेचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. नातलगांना त्याबाबत माहिती देण्यात आली. करोनाबाधित बहुतांश मृतांवर पंचवटीतील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यानुसार या महिलेचे नातेवाईक अंत्यसंस्कारांबाबतच्या चौकशीसाठी अमरधाम येथे गेले. परंतु, मृत व्यक्ती ज्या गावातील आहे तेथेच नेऊन अंत्यसंस्कार करावेत असा नवीन शासननिर्णय आला आहे. त्यामुळे गावाकडे अंत्यसंस्कार करावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यांना गावकडूनही नकार मिळाल्याने बिकट परिस्थिती उद्भवली होती.

अंत्यसंस्कार करून मगच गावी या, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे अंत्यसंस्कार करायचे कुठे याबाबत नातेवाइकांची द्विधा स्थिती निर्माण झाली. त्यामुळे नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परतले. अंत्यसंस्कार करायला परवानगी मिळत नसल्याची कैफियत तेथील कर्मचाऱ्यांकडे मांडण्यात आली. हॉस्पिटल प्रशासनाने महापालिकेशी समन्वय साधला. त्यानंतर या वृद्धेचा अंत्यविधी म्हसरूळ परिसरातील स्मशानभूमीत करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती रुग्णाच्या नातलगाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *