ज्येष्ठ नागरिकाला पावणेदोन लाखांचा गंडा

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याचे सांगून कार्डाची माहिती घेऊन एक लाख ८६ हजारांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रवींद्रनाथ कुरलेक (वय ७६) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ नोव्हेंबर २०२० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील आनंदनगरमध्ये ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रनाथ आनंदनगरमध्ये राहतात. नऊ नोव्हेंबर रोजी त्यांना एका व्यक्तीने फोन करून बँक ऑफ बडोदामधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना ‘तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे,’असे सांगितले आणि रवींद्रनाथ यांच्या बँक खात्याची सर्व माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्यांच्या दोन बचत खात्यातून एक लाख ८७ हजार रुपये ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शनद्वारे दुसऱ्या खात्यावर वर्ग करून घेतले. खात्यामधून पैसे कमी झाल्याचे समजल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणी सायबर पोलिसांनी तपास करून सिंहगड रोड पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यास पाठविला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *