प्रेयसीच्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे दीड लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या प्रियकराला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे दीड लाख रुपये घेऊनही आरोपीने ही अश्लील छायाचित्र प्रेयसीच्या नियोजित वराला पाठवून तिचे लग्न मोडले.
विरार येथे राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचे नालासोपारा येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाबरोबर मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात आरोपी तरुणाने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. दरम्यान, आंतरधर्मीय असल्याने मुलीच्या लग्नाला कुटुंबाने विरोध केला आणि मुलीचे दुसरीकडे लग्न जुळवले. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने मुलीच्या आईकडून दीड लाख रुपयांची खंडणी मागितली. ती न दिल्यास मुलीचे अश्लील छायाचित्र नियोजित वराला दाखविण्याची धमकी दिली होती.
मुलीचे लग्न तुटेल या भीतीने मुलीच्या आईने त्याला पैसे दिले. मात्र पैसे घेऊनही आरोपीने मुलीची अश्लील छायाचित्रे तिच्या नियोजित वराला पाठवली.यामुळे तिने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात बुधवारी प्रियकराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याची माहिती पोलीस उनपिरीक्षक पालवे यांनी दिली.