कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. ससून रुग्णालयात तीन दिवसांपासून रेमडिसिव्हरचे इंजेक्शन मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पुण्यात रेमडिसिव्हर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रेमडिसिव्हर औषध मिळत नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला आहे. दरम्यान, संचारबंदी असतांना नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमलेत आहेत. आता रेमडिसिव्हर औषध उपलब्ध करुन देण्यात येईल की आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार याकडे लक्ष आहे. जर कारवाई केली तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
रेमडिसिव्हर औषध मिळत नसल्याने ठिय्या आंदोलन करणाऱ्यांनी काही वेळापूर्वी रस्ता रोकोही केला. संतप्त नातेवाईकांनी रस्त्यातच बसत निषेध केला. रेमडिसिव्हरचा काळाबाजार होत असल्यानं रेमडिसिव्हर औषध मिळत नाही, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ससून रुग्णालयात तीन दिवसांपासून रेमडिसिव्हरचे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त आहेत.