लग्नाचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वेतून पळवून नेण्याचा कट रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे. रेल्वेगाडीमधील शौचालयात लपवून ठेवलेल्या या मुलीला मोठ्या शिताफीने पोलिसांनी बाहेर काढले. मात्र या कारवाईदरम्यान तिचा तथाकथित प्रियकर नातेवाईकांसह फरारी झाला आहे.
ताब्यात घेतलेल्या मुलीला सध्या ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या मुलीला एर्नाकुलम एक्सप्रेस या रेल्वेगाडीतून पळवून नेले जात असल्याची माहिती केरळ पोलिसांनी कोकण रेल्वेच्या मडगाव येथील रेल्वे सुरक्षा दलाला दिली. त्यामुळे ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी रेल्वे पोलीस व ग्रामीण पोलीस यांचे संयुक्त पथक तयार करून या पथकाचे तीन भाग केले आणि गेल्या सोमवारी ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर कसून तपासणी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रेल्वेगाडीचे सर्व डबे तपासले. मात्र संशयित मुलगी सापडली नाही. अखेर पोलिसांनी डी-१ या डब्यामध्ये पुन्हा प्रवेश करून त्या मुलीचा फोटो प्रवाशांना दाखवला. त्यावेळी एका महिलेने तिला ओळखले. ही मुलगी याच डब्यात होती, असे तिने सांगितल्यामुळे पुन्हा शोधाशोध सुरू झाली. त्या वेळी डब्यातील उजव्या बाजूचे शौचालय आतून बंद होते. आवाज दिल्यानंतररही ते उघडले गेले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी बाहेरून प्रयत्न करत अखेर शौचालयाचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये १३ वर्षीय मुलगी आढळून आली. या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती समाधानकारक उत्तरे देत नव्हती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी केरळमधील कन्नूर येथील पोलिसांशी संपर्क केला तेव्हा विकी नामक तरूण लग्नाचे आमिष दाखवून तिला राजस्थानला पळवून नेत असल्याची माहिती दिली.