पालघर तालुक्यातील दातिवरे गावाजवळील खार्डी येथे शिलाहारकालीन गधेगळ शिलेचे अस्तित्व प्रकाशित झाले असून याच गावांमध्ये १५०० वर्षे जुने शिलाहारकालीन मंदिराचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खार्डी गावाच्या शिलाहारकालीन पुराव्यांनी इतिहासाला नव्याने साद घातली आहे.
‘किल्ले वसई मोहीम परिवारा’ अंतर्गत गुढीपाडव्याच्या प्रसंगी खार्डी गावातील वाघ देवाची डोंगरी मंदिराच्या मागे, मालेपाडा मानपाडा यांच्या हद्दीवर शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळेचे ऐतिहासिक महत्त्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध व प्रकाशित करण्यात आले. खर्डी येथील दुर्गप्रेमी योगेश विश्वनाथ भोईर यांनी या शिलालेखाची माहिती डॉ. श्रीदत्त राऊत यांना दिल्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी या शिळेचा प्रथम वेध घेण्यात आला होता.
दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौल साम्राज्यापर्यंत पसरलेली होती आणि सुमारे सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष राज्य करीत होती. उत्तर कोकणात शिलाहारांचा कालावधी इ.स. ८०० ते १२६५ असा सुमारे ४०० वर्षांचा मानण्यात येतो. वसई किरवली व पालघर तालुक्यातील खार्डी येथे मिळालेल्या अवशेषावरून हे साम्राज्य १२७१ पर्यंत असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. खार्डी गावातील उपलब्ध झालेला शिलालेख ११ व १२ व्या शतकातील इतिहासाची मूक पाने बोलकी करणार आहे.
या पार्श्वभूमीवर अधिक अभ्यास केल्यानंतर सुमारे पंधराशे वर्षे जुना असणाऱ्या दोन हजारहून अधिक विटा सापडले असून शिलाहार मंदिराचे अस्तित्व उदयास आले.