बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे चिकनच्या मागणीत काही महिन्यांपूर्वी घट झाली होती. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून कोंबड्यांचे पालन कमी प्रमाणावर केले गेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिकनच्या मागणीत वाढ झाल्याने जिवंत कोंबड्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने चिकनच्या दरात वाढ झाली आहे. एरवी १५० ते १६० रुपये किलो असणाऱ्या चिकनचे दर अडीचशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने चिकन तसेच अंडी सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. बर्ड फ्लूच्या संकटात अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पक्ष्यांचे पालन केले नाही. टाळेबंदीची भीती तसेच कोंबड्यांच्या तुटवड्यामुळे गेल्या पंधरवड्यापासून चिकनच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने एप्रिल-मे महिन्यात चिकनच्या दरात मोठी वाढ झाली होती, असे पुणे जिल्हा बॉयलर ट्रेडर्स असोसिएशनचे संचालक अणि शीतल अॅग्रो ट्रेडिंगचे रूपेश परदेशी यांनी सांगितले.
उन्हाळ्यात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होतो. पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने ग्रामीण भागातील कुक्कुटपालन केंद्रे बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे सध्या बाजारात जिवंत कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. उन्हाळ्यात जिवंत कोंबड्यांचे (पक्ष्यांचे) वजन वाढत नाही. या कालावधीत पक्षी मोठ्या प्रमाणावर पाणी पितात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. कोंबड्यांचे खाद्य महाग झाले आहे. पक्ष्यांचे संगोपन करण्याचा खर्च वाढल्याने चिकनच्या दरात वाढ होत आहे, असे त्यांनी सांगितले.
