देशाची राजधानी दिल्ली करोना वाढत्या करोना संक्रमणानं बेजार झालीय. आता दिल्लीत प्रत्येक व्यक्तीसाठी मास्क परिधान करणं अनिवार्य आहे. बुधवारी एका याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार, दिल्लीत यापुढे प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणं अनिवार्य राहील. एखादी व्यक्ती गाडीतून एकटी प्रवास करत असेल तरीदेखील त्या व्यक्तीला मास्क परिधान करावं लागेल. कोणत्याही वाहनातून व्यक्ती प्रवास करत असेल तरी ते सार्वजनिक स्थळ आहे, त्यामुळे तिथेही मास्क अनिवार्य असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.
दिल्ली सरकारकडून एप्रिल महिन्यापासून गाडी चालवतानाही मास्क परिधान करणं अनिवार्य केलं होतं. सरकारच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. खासगी गाडीतून एकट्यानं प्रवास करत असतानाही दंड लावणं अन्यायकारक असल्याचं सांगत सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या चारही याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावल्या आहेत.
