वाशीत साकारतेय पहिले श्वान उद्यान

वाशी येथील स्थानिक माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांच्या पुढाकाराने सेक्टर आठमधील वीर सावरकर उद्यान येथे नवी मुंबईतील पहिल्या श्वान उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. उद्यानातील एका बाजूला ८७० चौरस मीटर क्षेत्रातील जागेत हे उद्यान उभारले जात आहे. या दरम्यान या उद्यानातील मूळ रचनेला कोणताच धक्का लावला जाणार नाही. या श्वान उद्यानाचा एकूण खर्च २६ लाख रुपये आहे.

नवी मुंबईत लहान-मोठी अशी ४२ हून अधिक उद्याने आहेत. मात्र प्राण्यांसाठी एकही उद्यान नाही. त्यातच शहरातील अनेक नागरिकांच्या घरी पाळीव श्वान आहेत. त्यांना बागेत घेऊन फिरायला जाताना अनेक अडचणी येत असतात. त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने अनेकांना त्रास सहन करावा लागतो. बागेत फिरायला येणारे अनेकजण यावर नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे खास श्वानांसाठी शहरात एक उद्यान असावे, अशी मागणी नागरिकांकडून गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. त्यासाठी महापालिकेनेही पुढाकार घेऊन नेरूळ येथे पहिले श्वान उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही नागरिकांनी त्याला विरोध केल्याने हे काम थांबले, ते अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. त्यानंतर वाशीमध्ये हे उद्यान उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो प्रलंबितच होता. आत्ता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे स्थानिक माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी पाठपुरावा करून काम मंजूर करून घेतले आणि त्या नुसार आत्ता या ठिकाणी उद्यानाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

तीन महिन्यांत हे उद्यान तयार होणार असून तिथे श्वानांना फिरण्यासाठी कोणतेही शुल्क सध्यातरी आकारले जाणार नाही. सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे. श्वानांना येथे मोकळ्या वातावरणात फिरता येणार आहे.

– दिव्या गायकवाड, माजी नगरसेविका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *