ठाणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी सूरज चव्हाण याने पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सूरज चव्हाण याला अटक केली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षामध्ये सूरज चव्हाण हा पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तो कोपरी येथील सिद्धार्थनगर परिसरात राहतो. याच परिसरात करण भंडारी हा तरुणही राहतो. सूरज आणि करण या दोघांमध्ये काही कारणांमुळे पूर्वीपासून वाद होते. मंगळवारी रात्री सूरज आणि करण यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. या वादात सूरजने करणवर चाकूहल्ला केला. घटनेत करण जखमी झाला. याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
