तो एवढी दारु प्यायला होता की पोलिसांचा ब्रिद अ‍ॅनलायझरही तुटला

मद्यपान करुन गाडी चालवू नका असं अनेकदा प्रशासन आणि पोलिसांकडून सांगितलं जातं. मात्र काही तळीराम या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करत स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकताना दिसतात. अशा बेजबाबदार चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी नाकाबंदी करुन ब्रिद अ‍ॅनलायझरच्या मदतीने चालकाने मद्यपान केलेलं नाही ना हे तपासताना दिसतात. केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये अशापद्धतीची नाकेबंदी केली जाते. मात्र ब्रिटनचा भाग असणाऱ्या उत्तर आयर्लण्डमधील एका दारुड्याने एवढी दारु प्यायली होती की त्याने पोलिसांकडील ब्रिद अ‍ॅनलायझरच तोडला. या व्यक्तीला पोलिसांच्या संपत्तीला नुकसान पोहचवणं आणि दारु पिऊन गाडी चालवणं या दोन्ही गुन्ह्यांसाठी दंड ठोठावण्यात आलाय.

रविवारी (२८ मार्च रोजी) पहाटेच्या वेळी लंडनडेअरी शहरातील टोबेरमोअर येथील रस्त्यावर ही घटना घडल्याचं डेली मेलने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या चालकाला थांबवण्यानंतर नियमांप्रमाणे पोलिसांनी ब्रिद अ‍ॅनलायझरच्या मदतीने या चालकाची चाचणी केली असताना ब्रिद अ‍ॅनलायझरच तुटलं. या चालकाने एवढी दारु प्यायली होती की ब्रिद अ‍ॅनलायझरचाही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर पोलीस या दारुड्या चालकाला पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले. तेथे दुसऱ्या एका ब्रिद अ‍ॅनलायझरच्या मदतीने या व्यक्तीच्या शरीरामधील दारुचं प्रमाण तपासून पाहिलं असता ते १८० पर्यंत आलं. हे प्रमाण कायद्यानुसार दिलेल्या परवानगीच्या पाच पट अधिक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युकेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक प्रमाणात मद्य शरीरात असतानाच पोलिसांनी कारवाई केलेल्या चालकांमध्ये या चालकाचा समावेश झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *