मुंबईमध्ये मॉलमधील एका रुग्णालयात लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. भांडूपमध्ये रुग्णालयात करोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर जवळपास ७० करोना रुग्णांची सुटका करण्यात आली. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल सनराइज हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. मुंबईत एकीकडे करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असतानाच आग लागल्याची ही घटना घडली. गुरुवारी मुंबईत तब्बल ५५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.
“आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२.३० वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी दिली.
“७३ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय इतर रुग्ण हॉस्पिटलच्या इतर वॉर्डमध्ये दाखल आहेत,” अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये हॉस्पिटल पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७० रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
