मनमाड : या सप्ताहात गेल्या चार दिवसांपासून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल आणि उन्हाळ कांद्याचे भाव एक हजार रूपये क्विंटलवर स्थिर आहेत. कांद्याची आवकही बऱ्यापैकी आहे. परंतु भाव नसल्याने कांदा उत्पादक आर्थिकदृष्ट्या हैराण झाले आहेत.
गुरूवारी मनमाड बाजार आवारात लाल आणि उन्हाळ कांद्याची ४९१ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. लाल कांदा ६०० ते ११३०, सरासरी १००० हजार रूपये तर उन्हाळ कांद्याला ६५० ते १०६२, सरासरी ९५० रूपये क्विंटल असे भाव होते. मक्याची ५३ नग इतकी आवक झाली. त्याला ११७६ ते १५२४, सरासरी १४५० रूपये क्विंटल भाव होता. दरम्यान, जिल्ह्याातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक हळूहळू वाढत आहे. मध्यंतरी खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक घटल्याने दर तीन हजारापर्यंत गेले होते. परंतु नंतर उशिराच्या खरीपातील लाल कांदा येऊ लागला. त्याची आवक अद्याप टिकून आहे. त्यात उन्हाळची आवक सुरू झाली. देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे दरात घसरण झाल्याचे सांगितले जाते. कांदा दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
