पालघर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना करोना

जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील ४२ विद्यार्थी व सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्या पाठोपाठ पालघर नंडोरे येथील नऊ विद्यार्थिनींना करोनाचा संसर्ग झाला आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोनाच्या  सक्रिय रुग्णांची संख्या २०५ वर पोहोचली असून करोना रुग्णासंख्या जिल्ह्यात वाढताना दिसत आहे.

जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आश्रमशाळेतील ४८ विद्यार्थी- कर्मचारी करोनाग्रस्त झाल्यानंतर या शाळेतील २१७ विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. पालघरजवळील नंडोर आश्रमशाळेत १०७ मुलं व ५५ मुलींचे वास्तव्य असून त्यापैकी नऊ मुलींना करोनाची लागण झाली आहे. या शाळेतील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींसह ३४ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

जयपूर येथे डेस्टिनेशन विवाहाला गेलेले पालघरमधील सुमारे दोनशेहून अधिक प्रतिष्ठित नागरिक जयपूरहून परतल्यानंतर तीन नगरसेवकांसह अन्य काहींना करोनाची बाधा झाल्याची माहिती पुढे आली होती. याप्रकरणी तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष यांनी जयपूर येथे प्रवास केलेल्या सर्व नागरिकांची करोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अजूनपर्यंत सत्तरहून अधिक पालघरच्या नागरिकांची तपासणी केली असून यापैकी बहुतांश चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पालघरच्या ग्रामीण भागात जव्हार तालुक्यात सर्वाधिक ८५ करोना सक्रिय रुग्ण असून पालघर तालुक्यात ७५, वाडा तालुक्यात ३२, डहाणू तालुक्यात १२ तर विक्रमगड तालुक्यातील एका नागरिकाला करोनाची लागण झाली आहे. मोखाडा, तलासरी व वसई ग्रामीण मध्ये सद्य:स्थितीत करोना रुग्ण नसल्याचे शासकीय अहवालावरून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *