ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नाटक, सिनेमातून अभिनयाचा ठसा उमटवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. दरम्यान, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवणारा, चतुरस्र अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोघे यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
श्रीकांत मोघे यांचा जन्म. ६ नोव्हेंबर १९२९ किर्लोस्करवाडी येथे झाला. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, पु ल देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये ‘दिल देके देखो’या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती.
श्रीकांत मोघे हे नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता या बरोबरच ते चित्रकार आणि वास्तुविशारद होते, उत्तम सुगम संगीत गायकही होते. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे यांचे वडील कीर्तनकार होते

