मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी हजारावर नवीन करोना बाधितांची नोंद झाल्याने चिंता वाढत आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यानंतर प्रथमच अशाप्रकारे मुंबईत रुग्णवाढ दिसत आहे. यामुळे पालिकेने आवश्यकती सर्व पावले उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई पालिका हद्दीतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढून ९ हजारपार गेला आहे
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोना रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. गेले तीन दिवस सातत्याने मुंबईत एक हजारावर नवीन बाधितांची भर पडत असल्याने करोनाची भीती वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे नवे १ हजार ३४ रुग्ण आढळले तर ७१२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ९ हजार ३१५ इतका झाला असून आतापर्यंत एकूण ३ लाख २३ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे व ३ लाख २ हजार २३२ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत मुंबईत ११ हजार ४६१ रुग्ण करोनामुळे दगावले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मुंबईतील रिकव्हरी रेट कमी होऊन आज ९३ टक्क्यांवर आला आहे.
मुंबईत सध्या चाळीत आणि झोपडपट्टीत मिळून १३ कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळलेल्या १२० इमारती सील करण्यात आल्या आहेत, असे पालिकेच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतही करोना पुन्हा डोके वर काढत आहे. आज धारावीत १६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे धारावीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१ वर पोहचली आहे. धारावीत आतापर्यंत ४ हजार ६६ करोना बाधित आढळले असून त्यातील ३ हजार ६९९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दादरमध्ये आज १५ नवे रुग्ण आढळले आहेत तर माहीममध्ये १३ रुग्णांची भर पडली आहे. दादरमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३२ झाली आहे तर माहीममध्ये हा आकडा १५० वर पोहचला आहे.
