जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची रक्कम मागून २० लाखांवर तडजोड करून ती रक्कम स्वीकारणाऱ्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यास आज रंगेहाथ पकडण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम मागितल्याचा हा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला प्रकार आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक नगर रचनाकार गणेश हनुमंत माने यांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक आदिनाथ बुधवंत या प्रकरणासंदर्भातील माहिती दिली. एका सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्षांनी नगर रचना विभागातील अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्याकडील अकरा एकर जमिन अवसायनात गेली होती. त्याचे मूल्यांकन करण्यासाठी ते सह जिल्हा निबंधक कार्यालयात गेले होते. तेथे त्यांची भेट सहाय्यक नगररचनाकार गणेश माने यांच्याशी झाली. माने यांनी त्यांच्याकडे हे काम करण्यासाठी ५० लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत २० लाख रुपये देण्याची तडजोड झाली. मात्र यासंदर्भातीला माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकला दिली.
त्यानुसार आज सकाळी माने यांना रंगेहात पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. तक्रारदार वीस लाखाची रक्कम गणेश माने यांना देत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडलं, अशी माहिती बुधवंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.