भिंत उभारल्याने हजारो शेतकरी पिण्याचं पाणी, शौचालयांपासून वंचित; आंदोलक शेतकऱ्यांचे हाल

भिंत उभारल्याने हजारो शेतकरी पिण्याचं पाणी, शौचालयांपासून वंचित; आंदोलक शेतकऱ्यांचे हाल

कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर काँक्रीटचं बांधकाम करत या भिंती उभारुन दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केलीय. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र यामुळे आता शेतकऱ्यांना दिल्ली सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या शौचालय व्हॅन आणि पाण्याच्या टँकर्सपर्यंतही पोहचता येत नाहीय. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर पाणी आणि शौचालयांसारख्या मूलभूत गरजांपासूनही वंचित असल्याचे चित्र दिसत आहे.

दिल्ली पोलिसांनी  या भिंती उभारल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असला तरी आपण मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. “आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर आम्ही पाण्यासाठी बोरवेल खोदू. पाण्याचा पुरवठा बंद केल्याने आम्ही मागे हटू असा विचार सरकारने करु नये. आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत गावी परत जाणार नाही,” असं पटीयाला येथून आंदोलनासाठी आलेल्या कुलजीत सिंग या शेतकऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं आहे.

महिलांना सहन करावा लागत आहे त्रास

दिल्ली-चंढीगड सीमेवर शौचालयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. चंढीगडच्या बाजूनेही काही शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र शौचालयांची संख्या आणि शेतकऱ्यांची संख्या यामुळे शौचालय वापरण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ वाट पहावी लागत आहे. याच कारणामुळे अनेक शेतकरी आता उघड्यावर शौचाला जात आहेत. महिला आंदोलकांची संख्याही जास्त असल्याने उभारण्यात आलेली शौचायले त्यांना वापरलाय देण्यास प्राधान्य दिलं जात आहे. हरयाणा दिल्ली सीमेजवळ हरयाणाच्या बाजूला कचऱ्याचा साठा वाढू लागला आहे. शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आलेल्या लंगरमध्ये वापरण्यात आलेली ताट, वाट्या आणि इतर एकदाच वापरुन फेकून देण्यात येणारा कचरा येथील रिकाम्या जागी नेऊन जाळून नष्ट केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *