राज्यातील विविध शहरांपाठोपाठ ठाणे शहरात मृतावस्थेत आढळलेल्या चार पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले असतानाच त्यापाठोपाठ आता शहरांमध्ये दिवसेंदिवस मृतावस्थेत आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या १७ दिवसांत शहराच्या विविध भागांत ४८३ पक्षी मृतावस्थेत आढळले असून मंगळवारी दिवसभरात ५३ पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामध्ये कावळ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
घोडबंदर येथील वाघबीळ परिसरात पंधरा दिवसांपूर्वी आढळलेल्या १५ बगळ्यांपैकी ३ बगळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर शहरात मृत पक्षी आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ३ ते १७ जानेवारी या कालावधीत शहराच्या विविध भागात ४८३ पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामध्ये बगळे २४, कावळे २२४, पोपट ५, कबुतर ८३, कोंबडय़ा १३४, पाण कोंबडी १, बदक १, कोकीळ ४, गिधाड १ यांचा समावेश आहे. तर, मंगळवारी दिवसभरामध्ये शहरात ५३ पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामध्ये कावळे २८, कबुतर २२ आणि कोकीळ ३ यांचा समावेश आहे.
